"मनाचे दिव्य संग्रह: मराठी सुविचार संग्रह"

This is about the thoughts and we all wrote about it as being in a group. Something that is daily life it relates to.

महाराष्ट्र म्हटले की मुळातच समोर येतात ते संत ज्ञानेश्वर माऊली, रामदास स्वामींचे मनाचे श्लोक आणि आपले समाजसुधारक. अशा थोरमोठ्या विचारांची प्रगल्भता असणाऱ्या संतांची वैचारिक गाथा आपल्या बुद्धीला कायम आकार देत आली आहे; आपल्याला घडवत आली आहे. ती संपत्ती कायमच आपल्यासोबत अविरत राहणार आहे, हे निर्विवाद सत्य असले तरी ती परंपरा कायम ठेवण्याची आपलीही जवाबदारी आहेच आणि म्हणूनच आम्ही ११ जाणींच्या एकोप्याने विचारांचा एक एक मोती संग्रहित करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. हे सुविचार रुपी धन आम्ही आपले संत व समाजसुधारकांच्या ठायी समर्पित करीत आहोत. 

सादर करीत आहोत ५० सद्विचार अर्थात सुविचार

#प्रेरणादायी सुविचार

#समाजप्रबोधनपर सुविचार

#नैसर्गिक संवर्धन शिकविणारे सुविचार

#व्यक्तिमत्त्व विकास घडवणारे सुविचार

१. सुगंधाची लयलूट करणारे स्वतः सोबत इतरांचे आयुष्यही मोहरून टाकतात.

२. कमळासारखे स्वच्छ, निर्मळ व्हायचे असेल तर चिखलाकडे दुर्लक्ष करण्याची क्षमता असायला हवी.

३. घरात वावरणारे आजी आजोबा म्हणजे लेकरांसाठी चालती बोलती ग्रंथशाळाच असतात.

४. यश मिळवायचे असेल तर तळमळ ही हवीच आणि पुढाकार घेऊन प्रयत्न करण्याची जिद्द ही असायलाच हवी.

५. कुठलाही बदल हा समोरच्याने स्विकारावा, असे वाटत असेल तर सुरुवात स्वतःपासून करायला हवी.

६. हा आताचा क्षण म्हणजे आयुष्य आहे. 

७. आवडत्या व्यक्तीचे स्वप्न पूर्ण करताना बाळगावी ती जिद्द आणि नसायला हवा तो अट्टाहास. 

८. नेहमीच डोळ्यात सणसणीत अंजन का घालायचे? उडू द्यावी धूळही कधीतरी, म्हणजे माणूस स्वतःचे डोळे स्वतःच स्वच्छ करायला किमान पुढे तरी धजावतो.

९. कुणासही न चुकलेल्या, संघर्षमयी आयुष्यात गुरफटण्यापेक्षा, स्वच्छंदी आयुष्याचा मार्ग शोधण्याचे कसब शिकण्याचा प्रयत्न एकदातरी नक्की करायला हवा. 

१०. शरीराला वय असते, पण मनाला वयाची अट कधीच नसते, म्हणून चांगल्या विचारांनी मनाला कायम तरुण ठेवता येते.

११. श्रीमंती ही नुसती धनाची नाही तर जिवाभावाच्या माणसांचीही कमवायची असते.

१२. आयुष्याने दिलेल्या संधी गमवायच्या नसतील तर स्वतःची निरीक्षण बुद्धी वाढवायला हवी.

१३. यशाच्या शिखरावर असताना खाली आपटणे म्हणजे संयम कुठे गरजेचा होता, हे शिकण्याची संधीही असू शकते.

१४. योग्य दृष्टिकोन कायम बरोबर तीच वाट तुमच्यासमोर मोकळी करतो.

१५. स्वतःला इतके मौल्यवान बनवायला हवे की, आपल्याला गमावणाऱ्याला वाईट आणि ज्याच्यासोबत असू त्याला आपल्या असण्याचे समाधान वाटले पाहिजे.

१६. घाव सहन करून जो समोरच्याला जपू शकतो, तोच आपल्या माणसांना सुरक्षितता देऊ शकतो.

१७. पान गळती झाल्यावर आयुष्य तिथेच संपत नाही; पालवी फुटून नव्याने बहर येणार, हे निश्चित असते.

१८. कणखर व्हायचे असेल तर घाव सुद्धा गरजेचे असतात; तीच योद्ध्याच्या निर्मितीची सुरवात असते.

१९. निसटून गेले त्यातून मोकळे व्हावे, आहे ते जगून घ्यावे अन् पुढ्यात असेल त्याचे स्वागत करावे - सुखी आयुष्याचा मंत्र.

२०. आपल्या आयुष्यातील थोडेसे क्षण जरी दुसऱ्यांच्या आनंदासाठी जगता आले तर आपले आयुष्य आणखी सुंदर होते.

२१. पुस्तकप्रेमी माणसाला एकटेपणाचे भय कधीच नसते.

२२. सहज जे चांगले होत असेल ते होऊ द्या; मोठे मन हे मौल्यवान धन आहे, हे आपल्याच मनास कळू दया.

२३. नाते असो वा असो संपत्ती, जपा अन् जमवा तितकीच, ज्याने ईर्ष्या व लोभ सुटणार नाही.

२४. रागावर नियंत्रण मिळवायचे असेल तर सहनशीलता आणि संयमतेचे अस्त्र बाळगायला शिकायला हवे.

२५. चांगले विचार म्हणजे कित्येक पिढ्यांसाठी साठवलेले धन असते.

२६. तितकेच द्या जितक्याची समोरच्याला गरज आहे; आपल्या देण्याचा कचरा होणार नाही, इतके स्वत्व नक्की बाळगायला शिकायला हवे.

२७. शंका मनाचा शत्रू आहे; नात्याला कीड लागू द्यायची नसेल तर वेळीच बोलते व्हायला हवे.

२८. तुमची हाक ऐकायला कुणीही नसले तरी चालेल, पण हाकेला प्रतिसाद देणे मात्र कधीच सोडू नये.

२९. हरणे, जिंकणे नियतीचा खेळ असेलही, पण सातत्याने प्रयत्न करत राहणे आपल्याच हातात असते.

३०. नात्यांना वंगणाची यंत्रा इतकीच गरज असते, म्हणून साद घालणे सोडू नये अन् प्रतिसादाची अपेक्षा बाळगू नये.

३१. पाण्याचा थेंब न् थेंब आणि आपला माणूस दोन्हीही जपायला शिकता यायला हवे, आयुष्यात दुष्काळ कधीही येणार नाही.

३२. मन, शरीर आणि निसर्ग संवर्धन आज करू तर उद्याची पिढी खऱ्या अर्थाने सुसंस्कृत अन् प्रगतीशील घडेल.

३३. अबला म्हणून घडाल तर आधारच शोधाल, आकाशाला गवसणी घालायची असेल तर हिरकणीचा ध्यास बाळगायला शिकायला हवे.

३४. पुरुष सुसंस्कृत विचारांचा असेल तर स्त्रीला संरक्षण कवचाची गरज कशाला भासेल? त्यासाठी घडा अन् घडवा असे की पुढच्या प्रत्येक पिढ्या स्त्री सुरक्षित रहायला हवी.

३५. बदल्याची नव्हे बदलाची भावना ठेवतो, तोच माणूस म्हणून घडतो.

३६. बोलण्या इतकेच ऐकायला शिकायला हवे; ऐकून घेतल्याने अर्ध्या प्रश्नाची उत्तरे सहज सोडवण्यास मदत होते.

३७. दुर्लक्षित असणे आणि दुर्लक्ष करणे, ह्यात अंतर आहे; मार्ग मोकळे होण्यासाठी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे शिकायला हवे, आयुष्य सुंदर होईल.

३८. निर्मळ, शुद्ध मन म्हणजेच समाधानी जगण्याच्या गुरुकिल्लीतील पहिली पायरी होय.

३९. सज्जनांची संगत लाभली तर आयुष्याला देव्हाऱ्यातल्या निर्माल्याचे भाग्य लाभते.

४०. निखळ हास्य म्हणजे कुठलेही धन खर्ची न करता मिळालेले औषध.

४१. शब्द आणि अस्त्रांची धार कुठल्या क्षणी वापरायची, हे समजणारे अनर्थ टाळण्याचे कौशल्य जाणतात.

४२. योग्य वेळी मागितलेली क्षमा आणि वेळीच घेतलेली माघार, कधीच आयुष्यात काही कमी पडू देत नाही.

४३. तुमच्या खेरीज तुमचे प्रेरणास्थान अजून कुणीही होऊ शकत नाही; मी जिंकू शकतो, ह्याचाच फक्त त्यासाठी ध्यास बाळगायला हवा.

४४. चमत्कार अनुभवयाचा असेल तर चमत्कारिक मेहनत तुम्हालाच घ्यावी लागेल.

४५. पुस्तकाविना घर म्हणजे देवाविना मंदिर.

४६. सद्विचारांची खाण असलेला मनुष्य जात्याच हिरा असतो.

४७. स्वतःच्या प्रेमात पडणे, हा आनंदी राहण्याचा मूलमंत्र आहे.

४८. जर आपण आपल्या भावनांवर जबरदस्ती नियंत्रण ठेवत असू, तर आपणच आपल्यासाठी घातक ठरू शकतो. 

४९. अंधश्रद्धेला हरवायचे असेल तर प्रगल्भ विचारांची शिदोरी बाळगायला हवी.

५०. आनंदातला सर्वात मोठा अडथळा म्हणजे तुमच्याकडे असलेल्या गोष्टींना कमी महत्त्व देणे आणि इतरांकडे असलेल्या गोष्टींना जास्त महत्त्व देणे होय.

*******